रेल्वेचा भूमीगत पूल : १५ दिवसांत काम पूर्ण होणार लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : येथील रेल्वेच्या नवनिर्मित भूमीगत पुलाच्या कामाची पाहणी आ. कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. सदर भूमीगत पूल पुढील पंधरवड्यात सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आ. गजबे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. रेल्वेच्या भूमीगत पुलाच्या कामासाठी १० जुलैपासून कुरखेडा-लाखांदूर मार्गावरील रेल्वेचे फाटक पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बायपास मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. वळती केलेला मार्ग अरूंद असल्याने नागरिकांना तासनतास ट्रॉफीक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी भूमीगत पुलाच्या बांधकामाला किती दिवसांचा कालावधी लागणार हे जाणून घेण्यासाठी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन भूमीगत पुलाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुढील पंधरवड्यात सदर भूमीगत पूल वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे उपस्थित रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन सदर भूमीगत पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
आमदारांनी केली पुलाची पाहणी
By admin | Published: July 13, 2017 1:43 AM