आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिला जात आहे.
धोडराज मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच कि. मी. अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंद स्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी यंत्र सामग्री आणण्यात आली नाही.
जि. प. कॉलनीतील घरांची दुरवस्था
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली असल्याने या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे. ही घरे दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी करतात ५० किमीवरून अप-डाऊन
धानोरा : तालुक्यातील अनेक कर्मचारी गडचिरोली येथे राहून सेवा देतात. ५० किमी अंतरावरून आल्यावर त्यांची काम करण्याची इच्छा राहात नाही. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेले राहतात. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहाणे सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.
कमलापुरातील समस्यांकडे दुर्लक्ष
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु, कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तपासणी नाक्यावर पुरेसे कर्मचारी द्या
आरमोरी : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीत आपली जबाबदारी निभावावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त होत आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी होत आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वन विभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ही अट शिथिल करण्याची मागणी होत आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत एसडीओंकडे जातात.
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
काेरची : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. नगर पंचायतीने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुग्ध व्यवसायाला चालना देण्याची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, जिल्ह्यात दुधाचे पुरेसे उत्पादन होत नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खुल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा.
अनुदानात वाढ करण्याची मागणी
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
अतिक्रमणाच्या विळख्यात आरमाेरी
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कमलापूर - रेपनपल्ली मार्ग खड्ड्यात
एटापल्ली : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन कि. मी.च्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याेजनांची माहिती मिळेना
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याचे दिसून येते.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली - आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी होत आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशु सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंबकल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटाराच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जंतूनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावा
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. त्यामुळे या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार ?
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहात नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
युवक गुंतले सट्टापट्टीच्या व्यवसायात
गडचिरोली : ग्रामीण भागात सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
मोडकळीस आलेल्या शाळांची दुरुस्ती करा
सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
देसाईगंज : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळाली नाही. महावितरणच्या कार्यालयात वारंवार येरझारा मारूनही शेतकऱ्यांचे काम झाले नाही.