मुलचेरा : पावसाळ्याला सुरुवात होताच अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. ६८ गावांचा समावेश असलेल्या मुलचेरा तालुक्यात तलाव, नाले, नद्या, पूल बऱ्याच प्रमाणात असल्याने कोणतीही आपत्ती येऊ शकते. अशावेळी बचावकार्य कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक गुरुवारी (दि. ३) येथील तलावात दाखविण्यात आले.
चामोर्शी तालुक्यात कन्नमवार जलाशय आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्यानंतर हे जलाशय तुडुंब भरून ओव्हरफ्लो होते. यामुळे मुलचेरा तालुक्यातील दिना नदीच्या पुलावर पाणी येते. या पूरपरिस्थितीने जीवित तसेच पिकांची व इतर वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते. काही संवेदनशील गावांचा संपर्क तुटतो. अशावेळी येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी महसूल विभागाच्या तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नगरपंचायत हद्दीत असलेल्या तलावात मॉक ड्रिलचे आयोजन केले होते.
याप्रसंगी तहसीलदार कपिल हटकर, नायब तहसीलदार तलांडे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे, तसेच महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपंचायत विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.