काैसर खान
गडचिरोली : गडचिराेली जिल्ह्यातील जंगलात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मोहफुलात अनेक पौष्टिक घटक आहेत; पण अवैध दारू गाळण्यापलीकडे त्याचा आतापर्यंत वापर न झाल्याने त्याची कुप्रसिद्धीच जास्त झाली आहे. आता मात्र हे माेहफुल अनेक पेय तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याच्या कामी येणार आहे. सिराेंचा तालुक्यात संकलित हाेणाऱ्या माेहफुलावर प्रक्रिया करण्यासाठी येथे एक युनिट स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून माेहफुलापासून ज्यूस आणि जाम तयार केला जाणार असून भविष्यात देश-विदेशात पाठविला जाणार आहे. त्यामुळे आता माेहफुलाला प्रतिष्ठा मिळण्याची आशा आहे.
ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर माेहफुलाचे संकलन हाेते. याचा वापर अनेक जण बैलांना खाद्य म्हणून करतात. काही जण अवैध दारू गाळण्यासाठी करतात. छुप्या पद्धतीने दारूविक्रेते माेहफुलाची अल्प किमतीत खरेदी करतात. सिराेंचा तालुक्यात माेठ्या प्रमाणात माेहफुलांचे संकलन हाेते. ही बाब ओळखून सिराेंचा येथे माेहफुल ज्यूस आणि जाम तयार करण्यासाठी एक युनिट स्थापन करण्यात आले आहे. या युनिटमध्ये तयार होणारे ज्यूस व जाम स्थानिक बाजारपेठेसह दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर येथे विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल.
याशिवाय काही दिवसांनंतर परदेशातही सदर पेय विक्रीसाठी पाठविले जाणार आहे. सध्या छत्तीसगढ राज्यातील मोहज्यूस फ्रान्समध्ये विक्रीसाठी पाठविला जात आहे. याच धर्तीवर सिराेंचातील ज्यूस व जामला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हमीभावात हाेणार खरेदी; प्रशिक्षणही मिळाले
माेहफुलाचे संकलन केल्यानंतर अनेक जण त्याची किरकाेळ दरात विक्री करतात. यामुळे संकलन करणाऱ्या मजुरांना फारसा लाभ मिळत नाही. परंतु, सिराेंचा येथे हमीभावात माेहफुलाची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय ज्यूस बनविण्याचे प्रशिक्षण लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथील तज्ज्ञांकडून काही लाेकांना देण्यात आले आहे.
१३ राेगांवर रामबाण
माेहफुलापासून तयार झालेले ज्यूस व जाम आम्लपित्त, बवासिर, खाेकला, मूत्रपिंडाचे विकार, हिरड्यांचे विकार, हिरड्यातून रक्त निघणे यासह अन्य राेगांवर गुणकारी असून जवळपास १३ राेगांवर रामबाण औषध ठरते.
माेहफूल खरेदीचे दर अल्प असल्याने अनेक जण वनविभागाला त्याची विक्री करीत नाही. याेग्य हमीभाव मिळाल्यास नागरिक माेहफुलाची विक्री करतील. त्यांचा याेग्य वापर हाेईल. याशिवाय, स्थापन केलेले युनिटही यशस्वी ठरेल.
- अनिल आत्राम, नागरिक, काेर्ला