गोठणगाव केंद्रावरील प्रकार : अधिकचे धान उचलण्यास दिली परवानगी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथील धानखरेदी केंद्रावरून धानाची अफरातफर करून आदिवासी विकास महामंडळाचे फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. गोठणगाव आदिवासी विविध कार्यकारीणीचे सचिव मनू बापू मंगर, केंद्र प्रमुख प्रल्हाद आसाराम ढोरे व तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक पी. आर. वाघमारे या तिघांना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील नेरी येथील सचिन खुशालराव कारेमोरे या राईसमिल मालकाने आधारभूत धानखरेदी हंगाम २०१३-१४ मध्ये खोटी बँक गॅरन्टी सादर करून १३ हजार ३५३ क्विंटल धानाची उचल केली होती. ६७ टक्के उताऱ्याप्रमाणे ८९४६.५० किलो क्विंटल तांदूळ एफसीआयकडे जमा करायचा होता. परंतु त्यांनी ५६४९.९३ क्विंटल तांदूळ जमा केला. उर्वरित ३२९६.५७ क्विंटल तांदूळ अजुनही मिल मालकाकडे शिल्लक आहे. सचिन कारेमोरे यांनी गोठणगाव केंद्रावरून ८०० क्विंटल धान उचल करण्याचा डीओ दिला असताना खरेदी केंद्राच्या सचिव व केंद्र प्रमुखांनी १५६८.२५ क्विंटल धानाची उचल करू दिली. यामुळे मंडळाचे नुकसान झाले. कारेमोरे व संस्थेचे सचिव म्हणून मनू मंगर, केंद्र प्रमुख प्रल्हाद ढोरे यांच्या विरोधात १ मे रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ४२०, ४०९, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मनू मंगर, प्रल्हाद ढोरे व पी. आर. वाघमारे यांना अटक केली आहे.
धानाची अफरातफर; तिघांना अटक
By admin | Published: May 20, 2017 1:35 AM