गडचिरोली : विळ्याच्या आकारासारखा रक्ताच्या पेशीचा आकार होतो. यामुळे मानवाच्या शरिरातील रक्ताचे संक्रमण होऊ शकत नाही. परिणामी कृत्रिम रक्ताची गरज भासते, अशा रोगाला सिकलसेल आजार असे म्हणतात. या रोगांवर कायमस्वरूपी इलाज नाही. मात्र त्याची तीव्रता कमी करता येते. जिल्ह्यात सध्यास्थितीत एसएस पॅटर्नचे १ हजार ५२९ सिकलसेलग्रस्त रूग्ण आहेत. तर एस पॅटर्नच्या सिकलसेल वाहक रूग्णांची संख्या जिल्हाभरात १३ हजार ९८२ आहे. या संख्येवरून अद्यापही जिल्हा सिकलसेल रोगाच्या विळख्यातच असल्याचे दिसून येते.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येतो. याच कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील बाराही तालुक्यात सिकलसेल रूग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. सन २००९-१० यावर्षात आरोग्य विभागाच्यावतीने एकूण ३८ हजार ३५० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७३ रूग्ण एसएस पॅटर्नचे आढळून आले. तर एस पॅटर्नचे वाहक रूग्णांची संख्या ३५४ इतकी आढळून आली. २०१०-११ या वर्षात १ लाख १० हजार २३० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी एसएस पॅटर्नचे ७६२ तर एस पॅटर्नचे ३ हजार ९१६ वाहक रूग्ण आढळून आले. २०११-१२ यावर्षात १ लाख ३७ हजार ८८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी एसएस पॅटर्नचे २९१ तर एस पॅटर्नचे २ हजार ३८० रूग्ण आढळून आले. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत बाराही तालुक्यात सिकलसेल रूग्णांची तपासणी करून सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमुन्याच्या तपासणीअंती १ लाख ९ हजार ९७३ रूग्णांपैकी एसएस पॅटर्नचे २४६ तर एस पॅटर्नचे ३ हजार ३६२ रूग्ण आढळून आले. एप्रिल २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या वर्षात १ लाख ९३ हजार ७९२ रूग्णांच्या रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. यापैकी एसएस पॅटर्नचे १५७ आणि एस पॅटर्नचे ३ हजार ९७० रूग्ण आढळून आले. ही रूग्ण संख्या चालु वर्षाची आहे. एकंदरीत ५ लाख ९० हजार २३० रूग्णांच्या तपासणीअंती एसएस पॅटर्नचे १ हजार ५२९ तर एस पॅटर्नचे १३ हजार ९८२ रूग्ण सध्यास्थितीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्ह्यात दीड हजाराहून अधिक सिकलसेलग्रस्त रूग्ण
By admin | Published: June 19, 2014 12:06 AM