गडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, अॅड. गोविंद पानसरे, डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी व हत्येच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी ५.३० वाजता धानोरा मार्गाने निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर, अॅड. गोविंद पानसरे मॉर्निंग वॉक करून घरी परतताना त्यांची हत्या करण्यात आली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आली. या घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच मारेकऱ्यांचा शोध लावण्यास शासनाला येत असलेल्या अपयशाचा निषेध मॉर्निंग वॉकमधून करण्यात आला. तिघांच्याही मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मॉर्निंग वॉकमधून करण्यात आली. दर महिन्याच्या २० तारखेला निर्भय मॉर्निंग वॉक राज्यात केले जाते. परंतु गडचिरोली येथे प्रथमच २१ ला मॉर्निंग वॉक करण्यात आले. यावेळी अंनिसचे विविध उपक्रम विठ्ठलराव कोठारे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह गजानन राऊत, उपाध्यक्ष देवाजी सोनटक्के, प्रा. देवानंद कामडी, प्रशांत नैताम, शहर आघाडीचे अध्यक्ष पंडित पुडके, कार्याध्यक्ष सुरेंद्र मामिडवार, पुरूषोत्तम चौधरी, दामोधर कांबळे, देवराव खोबरे, प्रा. शेषराव येलेकर, एस. आर. काळे, रामभाऊ कोहळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मारेकऱ्यांच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक
By admin | Published: May 22, 2016 1:09 AM