लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अवैध कोचिंग क्लासेससह ९० व्यावसायिकांना या संदर्भात नोटीस बजावली आहे. ही बाब मनपा नगरसेवकांना माहीत होताच या सर्व इमारतींवर व्यावसायिक कर लावण्यात यावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी लावून धरली होती. त्यामुळे या सर्व इमारतींची माहिती मागवून त्यांच्यावर व्यावसायिक कर लावला जाणार असल्याची माहिती आहे.सुरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये आग लागून १९ विद्यार्थी ठार झाल्याच्या घटनेने खडबडून जागे झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींची माहिती गोळा केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चंद्रपूर शहर हे सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. इतक्या उष्ण शहरात दुर्दैवाने अग्निशमन यंत्रणा नसलेल्या इमारतीला आग लागली तर काय होईल, याचा विचारही न केलेला बरा. बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शहरातील नागरिक किती असंवेदनशील आहेत, याचे हे बोलके उदाहरण ठरलेले आहे. अनेक मालमत्ताधारकांनी निवासी प्रयोजनासाठी बांधकामाची परवानगी घेतली आणि बांधकाम मात्र व्यावसायिक प्रयोजनासाठी करण्यात आले. व्यावसायिक प्रयोजनासाठी बांधकामाची मंजुरी मिळविताना अनेक अटींची पूर्तता करावी लागते आणि व्यावसायिक करसुद्धा भरावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी अनेक मालमत्ताधारक निवासी प्रयोजनासाठी बांधकामाची परवानगी घेतात.सुरतसारख्या घटना घडल्यानंतर यंत्रणा खडबडून जाग्या होऊन कामाला लागतात. तोपर्यंत पाणी मात्र चांगलेच मुरलेले असते. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आठवडाभरात ८३ जणांना नोटीस बजावली आहे. या सर्व इमारतींवर व्यावसायिक कर लावण्याची मागणी आता नगरसेवकांनी केली आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी पार पडली. या बैठकीत बहुतेक सदस्यांनी अग्निशमन विभागाने नोटीस बजावलेल्या सर्वांवर व्यवसायिक कर लावण्यात यावा, अशी एकमुखी मागणी केली. त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक कर लावण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार असून यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत लाखो रुपयांची भर पडणार आहे.
चंद्रपुरातील बहुतांश इमारती आग सुरक्षा यंत्रणेविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 12:18 AM
चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अवैध कोचिंग क्लासेससह ९० व्यावसायिकांना या संदर्भात नोटीस बजावली आहे.
ठळक मुद्देइमारतींवर व्यावसायिक कर लावणार : ९० व्यावसायिक इमारतींना नोटीस