महेंद्र रामटेके
आरमोरी (गडचिरोली) : सकाळीच शेतात गेलेली आई केव्हा परत येणार, म्हणून रस्त्याकडे डोळे लावून वाट बघणाऱ्या तिन्ही मुलींना अचानक आईला वाघाने ठार केल्याची बातमी कळली आणि त्या मुली व दिव्यांग पतीच्या पायाखालची जमीन सरकली. गवताच्या लहान झोपडीवर जणूकाही आभाळच कोसळले. मातृप्रेमाच्या विरहाने त्या मुलींनी अश्रूंना माेकळी वाट करून देत शेताच्या दिशेने धाव घेतली. आई...आई म्हणून नेहमी आर्त हाक देणाऱ्या मुलींचे त्या दिवशी शब्दही मुके झाले.
दिव्यांग पती आणि शिक्षण घेणाऱ्या तीन मुलींचा आई-वडील बनून सांभाळ करून कुटुंबाचा गाडा रेटणाऱ्या अरसोडाच्या नीलू जांगळे यांच्यावर शुक्रवारी वाघाने हल्ला करून बळी घेतला. त्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले. शिक्षण घेण्याच्या वयात पालकांवर अवलंबून असणाऱ्या मुलींच्या खांद्यावर दिव्यांग वडील आणि कुटुंबाची जबाबदारी आली. आईच्या रूपाने घरचा एकमेव आधार नेहमीसाठी हरवला. ध्यानीमनी नसताना अचानक ओढवलेल्या प्रसंगाने आईचे मातृत्व, प्रेम, आणि आधार यापासून त्या मुली कायमच्या पाेरक्या झाल्या. शासनाकडून लाखो रुपये मिळतील; पण आईचे प्रेम मात्र त्या मुलींना मिळणार नाही.
दिव्यांग पतीला होता तिचाच आधार
नीलू जांगळे यांचे कुटुंब अतिशय गरीब. पती हे गेल्या दहा-बारा वर्षांपासून दिव्यांग. रोजीरोटी आणि शेती करून तीन मुली आणि दिव्यांग पतीचा सांभाळ करीत हाेत्या. नीलूला सोनाली, मोनाली आणि देवकन्या अशा तीन मुली आहेत. पती दिव्यांग असल्याने ते खाटेवरच असतात. घरात कुणीही कर्ता पुरुष नाही, तरीही त्याची उणीव मुलींना कधीच भासू दिली नाही. गवताच्या झोपडीत राहून गरिबीचे चटके सहन करीत आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण देऊन मोठे बनविण्याचे स्वप्न हाेते.
जगण्याच्या साधनाने हिरावले जीवन
नीलूच्या शेतीजवळून एक नाला वाहताे. नाल्यात भरपूर पाणी असल्याने तिने यावर्षी उन्हाळी धानाची लागवड केली. उन्हाळी धानाला पाणी देण्यासाठी ती सकाळीच शेतावर गेली, तर ती कधी परत न येण्यासाठी. वाघ जवळ येताना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जवळच्या सागाच्या झाडावर ती चढली खरी; पण नियतीने तिचा पिच्छा सोडला नाही. झाडही तिची साथ देऊ शकले नाही. काही क्षणात वाघाने तिला झाडावरून खाली ओढून ठार केले व तिचा जीवनसंघर्षही थांबला. उदरनिर्वाहाच्या शेतीनेच नीलूचा जीव कुटुंबापासून हिरावला.