जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने ‘प्रकाशाचे पंख’ ही संवादमाला आयाेजित करण्यात आली आहे. दुसऱ्या सत्रात ‘कोरोनाच्या प्रदीर्घ प्रकोपानंतर सुरू होणाऱ्या शाळांतील शैक्षणिक संयोजन, नियोजन व व्यवस्थापन’ या विषयावर ऑनलाइन संवादाचे आयाेजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डाॅ. नांदेडे मार्गदर्शन करीत हाेते. संवादमालेच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे विद्यमान संचालक दिनकर टेमकर यांचे हस्ते करण्यात आले. डायटच्या वतीने समृद्ध शैक्षणिक नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकासाची ऑनलाइन संवादमाला सुरू करण्यात आली आहे. दर गुरुवारी विविध क्षेत्रात भरीव कामगीरी करणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व या संवादमालेत श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूबद्वारे होत आहे.
दिनकर टेमकर यांनी मार्गदर्शन करताना सध्याच्या वातावरणात प्रेरणादायी विचार या उपक्रमातून लोकांपर्यंत पोहोचतील ही खूप चांगली गोष्ट असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केला. प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.जगन्नाथ कापसे यांनी करून दिला. संचालन अधिव्याख्याता पुनीत मातकर यांनी केले.