आष्टी : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तालुका स्तरावर ग्रामीण रूग्णालय सुरू करण्यात आले. परंतु सुरू केलेल्या प्रत्येकच रूग्णालयात आरोग्य सुविधांचा पुरवठा केला जात नाही. आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह ६ पदे रिक्त असल्याने येथील रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रूग्णालयात समस्यांचा डोंगर उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात ३ वार्ड असून एकूण ३0 खाटांची व्यवस्था आहे. येथील रूग्णालयात परिसरातील रूग्णांसह चंद्रपूर जिल्ह्यातील राळापेठ, तारसा, विठ्ठलवाडा, तळोधी, सुरगाव, घाणा परिसरातील रूग्ण उपचार घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भरती होतात. रूग्णांची नेहमी रूग्णालयात वर्दळ असतांनासुध्दा मागील तीन महिन्यांपासून रिक्त असलेले वैद्यकीय अधीक्षकांचे पद भरण्यात आले नाही. २५ फेब्रुवारीपासून डॉ. अमोल धात्रक हे वैद्यकीय अधीक्षकांचा पदभार सांभाळत आहेत. यासह वैद्यकीय अधिकार्यांचे एक पद रिक्त आहे. सध्या दोनच वैद्यकीय अधिकारी दवाखान्याची धुरा सांभाळत आहेत. सहाय्यक अधीक्षक व कनिष्ठ लिपिकाचे पद ६ महिन्यापूर्वी भरण्यात आले. परंतु सदर पदावर अजुनपर्यंत कर्मचारी रूजु झाले नाही. ग्रामीण रूग्णालयातील रूग्णवाहिका अनेकदा नादुरूस्त राहत असल्याने नवीन रूग्णवाहिका देण्याची मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहेत. परंतु आरोग्य विभाग सतत दुर्लक्ष करीत आहेत. अपघात व अन्य आकस्मिक आपत्तीच्या वेळी रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. रूग्णालयात एक विहिर आहे. परंतु या विहिरीतील पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचाही तुटवडा अनेकदा जाणवतो. त्यामुळे इमारतीला लागूनच नवीन बोअरवेल उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण रूग्णायात सद्यस्थितीत गाेंडपिंपरी तालुक्यातील अनेक डेंग्यूचे रूग्ण भरती झाल्याने इतर रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे.(प्रतिनिधी)
ग्रामीण रूग्णालयात समस्यांचा डोंगर
By admin | Published: May 25, 2014 11:32 PM