राज्यस्तरीय असहकार : संवर्ग विकास अधिकाऱ्यांना संघटनेने दिला इशाराएटापल्ली : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित न्याय मागण्यांची सोडवणूक न झाल्याने ७ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय असहकार व कामबंद आंदोलन सुरू केले जाणार आहे. या आंदोलनात कुरखेडा तालुक्यात ग्रामसेवक सहभागी होणार, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने शुक्रवारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.ग्रामसेवक युनियनच्या वतीने ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाने ग्रामसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. परिणामी ग्रामसेवक संवर्गाच्या न्याय मागण्यांची सोडवणूक झाली नाही. या मागण्या शासनाने मान्य कराव्या, याकरिता ७ नोव्हेंबरपासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. ७ ला राज्यभर असहकार आंदोलन सुरू होऊन सर्व पंचायत समित्यांसमोर धरणे देण्यात येईल. १० ला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर ग्रामसेवक धरणे आंदोलन करतील. १५ नोव्हेंबरला राज्यातील ६ विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, १७ नोव्हेंबरला राज्यभर कामबंद आंदोलन सुरू करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाव्या व शिक्के संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक सुपूर्द करतील व दैनंदिन धरणे आंदोलन सुरू ठेवून मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना पदाधिकारी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामसेवकांचे ७ पासून आंदोलन
By admin | Published: November 06, 2016 1:42 AM