गडचिराेली/कुरूड : गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामराेजगार सेवकांचे मानधन थकित आहे. तसेच मागील चार वर्षांपासून प्रवास व अल्पाेपहार मिळाला नाही, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील ग्रामराेजगार सेवक २० ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदाेेलनावर गेले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजनेअंतर्गत ग्रामराेजगार सेवक गावपातळीवर काम करतात. त्यांच्या माध्यमातून मजुरांवर देखरेखीचे काम हाेते. जिल्ह्यातील ग्रामराेजगार सेवकांचे रखडलेले सहा महिन्यांचे मानधन मिळावे, यासाठी १० ऑगस्ट राेजी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले हाेते. परंतु काहीच उपयाेग झाला नाही. अखेर संतापलेल्या ग्रामराेजगार सेवकांनी २० ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदाेलनाचा मार्ग निवडला. त्यानुसार जिल्हाभरातील ग्रामराेजगार सेवक कामबंद आंदाेलनात सहभागी झाले आहेत, असे ग्रामराेजगार सेवक संघटनेने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविले.
यासंदर्भात राेजगार हमी याेजनेचे उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक संघटना व स्थानिकस्तरावर ग्रामपंचायतींनाही निवेदन देण्यात आले आहे. जाेपर्यंत मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही, ताेपर्यंत संघटना आंदाेलनावर ठाम राहील, असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
बाॅक्स...
या आहेत प्रमुख मागण्या
राेजगार हमी याेजनेची ग्रामपंचायतस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामराेजगार सेवक करतात. मजुरांना जाॅबकार्ड देणे, काम उपलब्ध करून देणे यासह विविध कामे ग्रामराेजगारसेवक करतात. जिल्ह्यातील ग्रामराेजगार सेवकांना १६ मार्च ते ३१ मार्च व १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंतचे मानधन मिळाले नाही. मागील चार वर्षांपासून प्रवासभत्ता देण्यात आला नाही. तसेच २०१८-१९ व २०१९-२० चा प्राेत्साहन भत्ता मिळाला नाही. ०.०५ टक्के प्रशासकीय खर्चही मिळाला नाही, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.