गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी दहा सुत्री अजेंडा निश्चित केला असून त्या प्राधान्य क्रमानेच प्रशासनालाही काम करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहे. भाराभर काम घेऊन कोणतेही काम तडीस जात नाही. उद्दिष्ट ठेवून काम केल्यास काम गतीमान पद्धतीने पूर्ण करता येऊ शकतात. याची जाण असणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली या एका तालुक्यासाठी महत्वाचे दहा प्रश्न मार्गी लावण्याकरिता प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना यादृष्टीने कामाला लागण्याबाबत दिशानिर्देश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी या दोघांनीही उपस्थित राहून कामाच्या प्राधान्य क्रमाची यादी निश्चित केली आहे. या यादीमध्ये तालुक्यातील लहान नद्यांवर उंच पूल बांधण्यासाठी बांधणे यादृष्टीने प्रशासनाला माहिती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात गडचिरोली येथे २०० बेडचे नवीन अतिदक्षता विभागाची इमारत बांधण्याबाबत नियोजन करणे, गडचिरोली पंचायत समितीची नवीन इमारत बांधणे, जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जीर्ण निवास्थानाचे इमारती निर्लेखीत करणे, शहरातील रखडलेले तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम त्वरित सुरू करणे, गडचिरोली तालुक्यातील सेमानादेव व गोगाव येथील देवस्थानाला पर्यटनस्थळाचा ‘क’ वर्गाचा दर्जा देणे, जंगलातील विविध वनौषधीवर आधारित प्रकल्प तालुक्यात उभारणे, २०१२ मध्ये काम पूर्ण झालेल्या जिल्हा कारागृह त्वरित सुरू करणे, जंगलालगतच्या शेतकऱ्यांना रानडुकरापासून संरक्षणासाठी ७५ टक्के सवलतीवर सोलर सिस्टीम देणे आदींचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)'
खासदारांनी निश्चित केला गडचिरोलीचा विकास अजेंडा
By admin | Published: November 19, 2014 10:39 PM