अॅप करता येणार डाऊनलोड : कॅशलेस व्यवहारांसाठी प्रयत्न; क्यूआर कोडचा समावेश गडचिरोली : महावितरणने वीज बिलात व्यापक प्रमाणात बदल केले आहे. सदर बिल नुकतेच ग्राहकांच्या हातामध्ये पडले आहे. या वीज बिलावर असलेल्या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल अॅप थेट डाऊनलोड करता येणार आहे. महावितरणच्या या नवीन अॅपमध्ये अनेक सोयीसुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक विभागाप्रमाणेच महावितरणही कॅशलेस, डिजिटल व आॅनलाईन बनण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी स्वतंत्र अॅप तयार करण्यात आला आहे. सदर अॅप चार ते पाच महिन्यांपूर्वीच तयार झाला असला तरी बहुतांश नागरिकांना सदर अॅप डाऊनलोड करण्याची तांत्रिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे नागरिक सदर अॅप डाऊनलोड करीत नव्हते. महावितरणने आता वीज बिलाचा चेहरामोहराच पूर्णपणे बदलविला आहे. स्मार्ट फोनमध्ये असलेल्या क्यूआर कोड रिडरच्या माध्यमातून वीज बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करता येतो. त्यावरून मोबाईल अॅपची लिंकही मिळते. वीज बिलावरील क्यूआर कोड हा अॅन्ड्राईड, आयओएस व व्हिडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे. मोबाईल अॅपमुळे महावितरणची ग्राहक सेवा एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत राज्यभरातील ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले आहे. या अॅपमधून उच्चदाब व लघुदाब वीज जोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील वीज बिल पाहणे, बिल भरणा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डसह मोबाईल व्हॉलेट, कॅश कार्डचा पर्याय आहे. वीज बिल भरलेल्या पावतीचा तपशीलही यामध्ये देण्यात येतो. वीज सेवेसाठी अॅपमध्ये टोल फ्री क्रमांकावर कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रार नोंदविण्याची सोय आहे. ग्राहकांना त्याच्या एका खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्या घेण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहकांना महावितरणच्या अन्य सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी ते अद्यावत करण्याची सोय आहे. सदर अॅप इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअर, अॅपल अॅप स्टोअरमधून सुद्धा सदर अॅप डाऊनलोड करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अॅपमध्ये समाविष्ट असलेली माहिती या अॅपमधून उच्चदाब व लघुदाब वीज जोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील वीज बिल पाहणे, बिल भरणा करण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डसह मोबाईल व्हॉलेट, कॅश कार्डचा पर्याय आहे. वीज बिल भरलेल्या पावतीचा तपशीलही यामध्ये देण्यात येतो. वीज सेवेसाठी अॅपमध्ये टोल फ्री क्रमांकावर कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रार नोंदविण्याची सोय आहे. ग्राहकांना त्याच्या एका खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्या घेण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४ नोटबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक स्मार्ट फोन व वॉलेटच्या माध्यमातून वीज बिलाचा भरणा करीत आहेत. कॅशलेसच्या माध्यमातून वीज बिल भरण्याचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
महावितरणचे वीज बिल बनले स्मार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2017 2:07 AM