मूलचेरा : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथील नगर पंचायतीने दाेन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता कचऱ्याची घरातून उचल हाेऊन ताे थेट डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाईल, अशी अपेक्षा आहे.
ट्रायसिल असलेल्या घंटागाड्यांनी कचऱ्याची उचल केल्यानंतर हा कचरा गावातच एखाद्या चाैकात असलेल्या कचराकुंडीत टाकला जात हाेता. या कचराकुंडीमुळे सभाेवतालच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कचराकुंडी घराजवळ ठेवू देण्यास विराेध करत हाेते. यावर उपाय म्हणून नगर पंचायतीने टिप्पर प्रकारातील दाेन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी साबळे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येकी ७ लाख रुपयांच्या दोन घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. या घंटागाड्यांच्या माध्यमातून मूलचेरा नगर पंचायतीच्या सर्व प्रभागांत फिरून ओला व सुका कचरा गोळा केला जाणार असून, ताे डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार आहे.