मुलचेरा येथील नागरिकांना रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, बीपीएल प्रमाणपत्रासाठी चकरा माराव्या लागतात. लाेकमत प्रतिनिधीने गुरुवारी नगरपंचायतला प्रत्यक्ष भेट दिली असता रामचंद्र पैकनजी येलमुले, इकाराम कड्यामी हे दाखले घेण्यासाठी नगरपंचायतमध्ये आले होते. त्यांनी आपली व्यथा यावेळी मांडली. नगरपंचायतमध्ये सात कर्मचारी असून, मुख्याधिकारी कुठे गेले याबाबत कुठलीही माहिती त्यांना नाही. वैयक्तिक शौचालय पूर्ण होऊनसुद्धा अनेक लाभार्थींचे हप्ते थकीत आहेत. तेसुद्धा नगरपंचायतचे उंबरठे झिजवत आहेत. मुख्याधिकारी नियमित कार्यालयात बसत नसल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. याबाबत मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता कोर्ट कचेरीच्या कामासाठी बाहेर असल्याचे सांगितले. नगरपंचायत प्रशासक म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांच्याकडे कार्यभार आहे. परंतु त्यांचेसुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
बॉक्स
सोईसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष
मुलचेरा नगरपंचायतचा कारभार ग्रामपंचायतच्या इमारतीत सुरू आहे. प्रशासकीय इमारतीचे दरवाजे कुजलेल्या अवस्थेत आहेत. तोकड्या जागेत आधार केंद्र सुरू आहे. मात्र तेथे नागरिकांना बसण्याची सोय नाही. डम्पिंग यार्डचे कामसुद्धा ऐरणीवर आहे. त्यामुळे सर्वत्र घाण पसरलेली आहे. ११ मार्च २०२० रोजी नवीन मुख्याधिकारी म्हणून अजय साबळे रुजू झाले. त्यावेळी अनेक मूलभूत समस्या मार्गी लागतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र एक वर्षांनंतरही समस्या ‘जैसे थे’ आहेत.