विशेष म्हणजे आता लॉयड्स मेटल्सने या कामातून अंग काढून घेत त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दाक्षिणात्य कंपनीकडे लोहदगड काढण्याची जबाबदारी ढकलल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारला जाण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. सुरजागड पहाडावरील लोहदगड काढण्याचे लीज मिळालेल्या लॉयड्स मेटल्सच्या गडचिरोली मेटल्स ॲन्ड मिनरल्स लि. या कंपनीने आपले काम सुरू करण्यापूर्वी, म्हणजे १५ वर्षांपूर्वी (दि. १२ जुलै २००५) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या जनसुनावणीत अनेक स्वप्ने रंगविली होती. जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारण्यासोबतच ९६५ नागरिकांना थेट रोजगार, तर जवळपास चार हजार नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असे आमिष दाखवले होते; पण आता ज्यांनी ही सर्व स्वप्ने दाखविली त्या कंपनीनेच अंग काढून घेत तिसऱ्याच कंपनीला समोर केल्याने जनसुनावणीत सांगितलेल्या बाबींसाठी प्रशासन कोणाला जबाबदार धरणार, हा प्रश्न पुढे येत आहे.
एका अपघाताने स्थानिक नागरिकांचा विरोध उफाळून आल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून लोहदगड काढण्याचे काम बंद आहे. पण आता हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी लॉयड्स मेटल्सने त्रिवेणी अर्थमूव्हर्स या कंपनीला पुढे केले आहे. ही कंपनी जनसुनावणीत सांगितलेल्या बाबी बाजूला ठेवून आपल्या अटींवर लोकांशी करारनामे करीत असल्याने हा स्थानिक नागरिकांचा विश्वासघात ठरणार आहे.
पोलीस संरक्षणाविना काम करणार कसे?
विशेष म्हणजे कामावर ठेवणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या जीविताची जबाबदारी संबंधित कंपनीची असते. मात्र त्रिवेणी कंपनी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. लॉयड्स मेटल्सला यापूर्वी दिलेल्या संरक्षणापोटी पोलीस विभागाचे जवळपास ४५ कोटी रुपये थकीत आहेत. ते मिळाल्याशिवाय या कामासाठी पोलिसांकडून संरक्षण मिळणार नाही. तरीही पोलीस संरक्षणाविना हे काम सुरू करण्याची हिंमत केली जात असल्यामुळे सदर कंपनीला कामगारांच्या जीविताशी घेणेदेणे नाही, की प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनीच त्यांना संरक्षणाची हमी दिली, अशी शंका घेतली जात आहे.