जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मिळेल त्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणले जात आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाकडे जनतेच्या सेवेसाठी असलेली रुग्णवाहिका कामात येत नसेल तर तिचा उपयोग काय? सदर वाहनाचे वाहन चालक कोरोनाच्या रुग्णाला वाहून नेण्याकरिता स्वतंत्र कप्पा नसल्याचे कारण सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना आल्यापावली परत पाठवीत आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेतून नेमके कशाची वाहतूक केली जाते, असाही प्रश्न विधाते यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील नागरिकांसाठी पालिका प्रशासनाने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोनाची साथ सुरू हाेण्यापूर्वी या रुग्णवाहिकांचा उपयोग योग्यरीतीने केला जात होता. कुठेही अपघात झाला तर रुग्णवाहिकेची सेवा मिळत होती. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अपघाताचे प्रमाण घटले आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असल्यामुळे मिळेल त्या वाहनाने कोरोना रुग्णांची वाहतूक केली जात आहे. असे असताना पालिकेकडे असलेल्या दोन्ही रुग्णवाहिकेतून रुग्णांची वाहतूक केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाप्रती कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन दोन्ही रुग्णवाहिकेची सेवा कोरोनाग्रस्त रुग्णांची वाहतूक करण्याकरिता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक सतीश विधाते यांनी केली आहे.