लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मार्च महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही गडचिराेली नगर परिषदेची केवळ ५४ टक्केच वसुली झाली आहे. सध्या झालेल्या कर वसुलीचे प्रमाण लक्षात घेतले तर आर्थिक वर्ष संपेपर्यंत, अर्थात पुढील १० दिवसात कर वसुलीवर पूर्ण भर दिला तरी ही वसुली ६० टक्क्यांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता नाही.गडचिराेली शहरात एकूण १२ हजार १७५ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांवर मालमत्ता करासाेबतच इतरही कर आकारले जातात. याला एकत्रित कर म्हटले जाते. यातून पाणीपट्टीची स्वतंत्र वसुली केली जाते. गडचिराेली शहराची एकत्रित कराची एकूण मागणी ४ काेटी ६० लाख ४६ हजार २१८ रुपये आहे. यामध्ये ३ काेटी ८० लाख ८० हजार ९७ रुपयांची चालू मागणी आहे, तर ७९ लाख ६६ हजार १२१ थकलेल्या कराची मागणी आहे. १८ मार्चपर्यंत एकूण २ काेटी ४६ लाख ३१ हजार २ रुपये एवढीच वसुली झाली आहे. यामध्ये चालू कर २ काेटी ६ लाख ३९ हजार ७१९ रुपये व थकीत कर ३९ लाख ९१ हजार २८३ रुपयांचा समावेश आहे. गडचिराेली नगर परिषदेची कर वसुली ७० ते ८० टक्क्यांपर्यंत राहत हाेती. मात्र, काेराेनामुळे कर वसुलीवर बराच माेठा परिणाम झाला आहे. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच काेराेनामुळे लाॅकडाऊन झाले. त्यामुळे वसुली जेमतेम ६० टक्क्यांपर्यंत पाेहाेचली हाेती. त्यानंतर लाॅकडाऊन कायम राहिल्याने अनेकांची आर्थिक स्थिती यावर्षीही बिघडली आहे. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक कराचा भरणा करण्यास नकार देत आहेत.
शहरी नागरिकांना सात प्रकारचे द्यावे लागतात करनगरपरिषदेचा मुख्य कर हा मालमत्ता कर आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडून आकारण्यात येणाऱ्या कराला काही नागरिक मालमत्ता कर असे संबाेधतात. मात्र, नगरपरिषदेकडून मालमत्ता करासाेबतच इतरही कर आकारले जातात. यामध्ये मालमत्ता कर २५ टक्के, वृक्ष कर १ टक्का, शिक्षण उपकर ४ ते ६ टक्के, राेहयाे कर १ ते ३ टक्के, उपभाेगता कर ७ टक्के, विशेष शिक्षण कर ७ टक्के, दिवाबत्ती कर २ टक्के, अग्निशमन कर १ टक्का आकारला जातो.
गडचिराेली शहराची २०२०-२१ या वर्षातील पाणीपट्टीची मागणी ९६ लाख २४ हजार ३३२ रुपये व थकीत पाणीपट्टी ३१ लाख २० हजार ४०८ रुपये अशी एकूण १ काेटी २८ लाख ४४ हजार ६४० रुपये आहे. त्यापैकी थकीत पाणीपट्टी १४ लाख ९० हजार ४१३ रुपये, चालू पाणीपट्टी २७ लाख ६८ हजार ९३७ रुपये वसूल झाली आहे. एकूण वसुली ४२ लाख ५९ हजार ३५० रुपये एवढी आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ३३.१६ टक्के एवढी आहे.
पाच पथकांची दाराेदारी भेटजास्तीत जास्त कर वसुली व्हावी, यासाठी नगरपरिषदेने पाच पथके नेमले आहेत. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत हे पथक प्रत्येक घराला भेट देऊन कर वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच १० हजारांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या व तसेच अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना नाेटीसही पाठविण्यात आली आहे.