आरमोरी (गडचिरोली) : स्थानिक आरमोरी नगरपरिषदेचे कर्मचारी कर वसुलीवर असल्याने नगरपरिषदेचे विविध विभाग कर्मचाऱ्यांअभावी ओस पडल्याचे चित्र सोमवारी प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे घरकूल व इतर अनेक कामांसाठी नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. सर्वच कर्मचारी वसुलीवर फिरतील तर नागरिकांची कामे काेण करणार आणि वर्षभरात नगरपरिषदेने कर वसुली का केली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
आठवड्यातील कामाचा पहिला दिवस असल्याने आरमोरी नगरपरिषदेत विविध कामांसाठी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नगरपरिषद क्षेत्रातील अरसोडा, आरमोरी व इतर अनेक भागांतील नागरिक व महिला कामासाठी आल्या होत्या. मात्र, नगरपरिषद कार्यालयातील विविध विभागांत कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना कित्येक वेळ वाट पाहावी लागली. नगरपरिषदेने फेब्रुवारी महिन्यापासून कर वसुलीची मोहीम हाती घेतली व त्यासाठी २५ पेक्षा जास्त कर्मचारी हे कर वसुलीसाठी फिरत असल्याने कार्यालयात कर्मचारी उपलब्ध नाही. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत आहे. सर्वच कर्मचारी वसुलीवर राहतील तर जनतेची कामे वेळेवर कशी होणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
वर्षभर काय करतात नगर परिषदेचे कर्मचारी?
नगरपरिषद प्रशासनाने कर वसुली ही वर्षभर सुरू ठेवायला पाहिजे हाेती. मात्र, मार्च ताेंडावर आला असताना आता कर वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांनी आपली समस्या नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यापुढे मांडण्याचा विचार केला. परंतु नगरपरिषदेत एकही पदाधिकारी नगरसेवक उपस्थित नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांची एकूण चार पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके दररोज सकाळी ८ ते ११ वाजता करवसुलीसाठी प्रत्येक घरी फिरत आहेत. मुख्याधिकारी स्वतः पथकांना भेटी देत आहेत. कर वसुलीकरिता पथके कार्यालयाच्या बाहेर शहरात असल्यामुळे कार्यालयात कर्मचारी हजर नव्हते. प्रत्येक पथकाचे जीपीएस फोटो उपलब्ध आहेत.
- आशिष हेमके, सहायक प्रशासन अधिकारी, नगरपरिषद आरमोरी