आरमोरी - मुलगा व सून यांच्यांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बापाला मुलाने जबर मारहाण केल्याने या मारहानीत बापाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली.
सखाराम रामजी उसेंडी (६०) असे मृतकाचे नाव आहे. तर उमाजी सखाराम उसेंडी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी उमाजी सखाराम उसेंडी व त्याच्या पत्नीमध्ये नेहमीच वादविवाद होत होते. १४ मार्च रोजी सायंकाळी उमाजीने त्याच्या पत्नीशी भांडण करून तिला जबर मारहाण केली. यावेळी वडील सखाराम याने सुनेला वारंवार का मारतोस, असे विचारले असता आरोपीने रागाच्या भरात वडिलास काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत वडिलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मृतकाच्या पत्नीने आरमोरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. आरोपी उमाजी याला ताब्यात घेतले. त्याला आरमोरी न्यायालयात गुरूवारी हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक परघने यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.