ऑनलाईन लोकमतसिरोंचा : बहीण आणि जावयात भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस जावईच कारणीभूत आहे, नव्हे जावयानेच तिला मारले असावे या संशयातून दोन साळयांनी चाकूने भोसकून जावयाचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात घडली.राजन्ना नामला (३२) रा. चिंतनवेल्ला असे मृत इसमाचे नाव आहे. त्याच्याशी संध्याराणी (२५) हिचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुलेही झाली. पण दोघांत नेहमी खटके उडत असत. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्यात भांडण झाल्यानंतर संध्याराणी हिने घरातील कीटकनाशक प्राषण केले. तिच्यावर आसरअली येथे प्राथमिक उपचार करून रात्री सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले, पण तिथे तिचा मृत्यू झाला.मंगळवारी सकाळी शवपरिक्षण सुरू असताना संध्याराणीचे दोन भाऊ आणि माहेरच्या काही लोकांची जावई राजन्नासोबत रुग्णालयाच्या गेटवरच बाचाबाची झाली. यावेळी राग अनावर झालेल्या माहेरच्या लोकांनी राजन्नाला जबर मारहाण केली तर संतोष (३०) व रमेश लखमय्या सोदारी (२८) या भावंडांनी चाकुने भोसकले. यात राजन्नाचा जागीच मृत्यू झाला. बाहिणीच्या मृत्युला जावई राजन्नाच कारणीभूत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली देऊन दोन्ही भावांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे राजन्ना व संध्याराणी यांच्या दोन्ही मुलांवरील आईवडिलांचे छत्र हिरावल्या गेले. आई-वडिलही नाही आणि दोन्ही मामा कारागृहात पोहोचल्याने त्यांची वाताहात होण्याची शक्यता आहे.
बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत जावयाची मेहुण्यांकडूनच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:08 AM
बहीण आणि जावयात भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस जावईच कारणीभूत आहे, नव्हे जावयानेच तिला मारले असावे या संशयातून .....
ठळक मुद्देसिरोंचातील घटना : दोन चिमुकल्यांवरील आई-वडिलांचे छत्र गेले