अपघात वाढले : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचेही दुर्लक्ष मुरूमगाव : धानोरा-मुरूमगावपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सदर मार्ग दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी होत असली तरी याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सुरूवातीला सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत होता. नक्षल्यांचे कारण पुढे करून या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील चार ते पाच वर्षांपासून दुरूस्ती केली नाही. मागील वर्षी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले. सदर मार्गाच्या देखभालीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेले. त्यामुळे मार्ग दुरूस्तीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र महामार्ग प्राधिकरणानेही मार्ग दुरूस्तीबाबत कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था अजुनही कायम आहे. दिवसेंदिवस या मार्गावरील खड्ड्यांचा आकार वाढत चालला आहे. या मार्गावरून भिलाई ते तेलंगणा राज्यात जाणारे मोठमोठे ट्रेलर लोखंडाची वाहतूक करतात. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
मुरूमगाव मार्ग खड्ड्यात
By admin | Published: March 17, 2017 1:14 AM