याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व पथकाने पंचनामा करून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिसांनी याप्रकरणी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीची आई किरण अविनाश बांबोळे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत या घटनेची पार्श्वभूमी सविस्तरपणे मांडली आहे. दीक्षा ही चंद्रपूर येथे बी.फार्म. द्वितीय वर्षाला शिकत होती. दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे ती येनापूर येथे आली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, गावातीलच एका दुकानदार युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले होते. दीक्षाने लग्न करण्याचा तगादा लावला, परंतु तिच्या प्रियकराने लग्नास नकार दिला. यातच २१ जुलैला घरी कुणीच नसताना त्या युवकाने माझ्या मुलीचा गळा दाबून व मारहाण करून तिचा खून केला, असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.
दीक्षाची आत्महत्या की हत्या, हे गूढ अजूनही कायम आहे. पुढील तपास अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुमारसिंग राठोड, अनिरुद्ध कुंडगिर करीत आहेत.