गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ९ नगर पंचायतींमध्ये प्रत्येकी १७ अशा एकूण १५३ जागांसाठी निवडणूक पार पडली. यापैकी १५२ जागांवरील निकाल घोषित झाले असून काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या आहेत. भाजप ३६, राष्ट्रवादी २६, आदिवासी विद्यार्थी संघ २०, शिवसेना १४ तर अपक्षला १६ जागा मिळाल्या आहेत.
प्रत्येक नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. व्यापारिकष्ट्या महत्वाच्या आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या चामोर्शी नगर परिषदेत कॉंग्रेसने ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा जिंकल्या. तेथे भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पराभव होऊन केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांचा चामोर्शी हा गृहतालुका आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. कुरखेडा येथे भाजपने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे शिवसेना-काँग्रेस आघाडी होती. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या ताकदीमुळे शिवसेनेला ५ जागा मिळाल्या, तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. कुरखेड्यात भाजपचे आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचे प्रयत्न फळाला लागल्याचे दिसून आले. कोरचीमध्ये ८ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपने तेथे ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला एक, तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या.
निवडणुक झालेल्या एकूण नगर पंचायती: ९एकूण जागा :१५३निकाल घोषित : १५२काॅंग्रेेस: ३९भाजप : ३६राॅष्ट्रवादी काॅंग्रेस: २६शिवसेना : १४आदिवासी विद्यार्थी संघ: १६अपक्ष : २०राष्ट्रीय समाज पक्ष : १