एटापल्ली : येथील नगर पंचायतीचे प्रशासकीय कार्यालय आदिवासी समाजाच्या गाेटूल भवनात तयार करण्यात आले आहे. परिणामी एटापल्ली येथे एकमेव असलेल्या गाेटूल भवनावर प्रशासनाकडून अतिक्रमण झाल्याने आता सार्वजनिक कार्यक्रम कुठे आयाेजित करायचे, असा प्रश्न आदिवासी समाजबांधवांना पडला आहे. येथील आदिवासी गाेटूल भवनात शासकीय बैठका व प्रशिक्षण आयाेजित केले जाते. शिवाय आदिवासींसह इतर समाजाचे कार्यक्रमही घेतले जातात. मात्र जुन्या कार्यालयात जागा कमी पडत असल्याच्या कारणावरून नगर पंचायतीचे कार्यालय या गाेटूल भवनात आणण्यात आले. त्यामुळे आदिवासी समाजबांधव अडचणीत आले आहेत.
एटापल्ली ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतरण हाेऊन पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायतीला नवीन इमारत बांधता आली नाही. नगर पंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतून सुरू हाेता. मात्र या इमारतीतील जागा कमी पडू लागली. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून हीच इमारत असल्याने ती फार जुनी आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार उपविभागीय अधिकारी मनाेज जिंदाल यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी नगर पंचायतीचे कार्यालय महसूल भवनाच्या इमारतीत हलविले. त्यानंतर नगर पंचायतीचे कार्यालय अलीकडेच गाेटूल भवनात हलविण्यात आले.
बाॅक्स....
दुरुस्तीवर लाखाे रुपयांचा खर्च
नगर पंचायत कार्यालय गाेटूल भवनात हलविण्यासाठी ही इमारत चांगली व सुस्थितीत असणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकाेनातून गाेटूल भवनाची रंगरंगाेटी करण्यात आली. विद्युत व्यवस्था करण्यात आली. तसेच इतर किरकाेळ दुरुस्त्यांचे कामही पूर्ण करण्यात आले. या कामावर जवळपास साडेआठ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आहे.