देसाईगंज: कित्येक वर्षांपासून कोंढाळा येथील सत्यवान रामटेके यांच्या घराजळील परिसरातील नाली उपसा केला नसल्याने नालीत बांधकामाची माती व कचरा जमा होऊन नाली गायब झाली आहे.
दरवर्षी ग्रामपंचायतीच्या मार्फत वर्षातून एकदा गावातील नाली उपसा करण्याचे काम कंत्राटदार वा स्वतः ग्रामपंचायत करीत असते. नाली उपसा करण्यासाठी मोठया प्रमाणात रक्कम खर्च केली जाते. मात्र, गावातील काही ठिकाणच्या नाल्यांचा उपसा केला जात नसल्याने दरवर्षी नाल्यांवर मातीचे ढिगारे व कचऱ्याचे थर जमा होऊन नाल्या दिसेनासे झाल्या आहेत. जणू काही नाल्या चोरीला गेल्या आहेत की काय, अशी अवस्था झाली आहे.
काही ठिकाणी नाली बांधकाम करण्यात आले. लाखो रुपये खर्च करून नाली बांधकामे बांधण्यात आली. मात्र, नालीचा उपसा हाेत नसल्याने ही नाली बेकामी झाली आहे. वार्ड क्रमांक ४मध्ये मागील कालावधीत तीन सदस्य राहूनही नाल्यांची अवस्था बिकट स्वरूपाची आहे. आता नव्याने सत्तारूढ झालेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.