गडचिरोली- जिल्ह्यातील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. याबाबत माजी खासदार नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.
'गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पासाठी लाईड्स या कंपनीने जमीन उत्खननासाठी आणलेली स्फोटकं वापरून नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवल्याचे' पटोले यांनी म्हटले आहे. लाईड्स या कंपनीचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. याबद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितले होते, अखेर याच कंपनीतील स्फोटके वापरून नक्षलद्यांनी हा स्फोट घडवून आणला, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सुरजागड तालुक्यात राज्य सरकारने अर्धसैनिक दलाची सुरक्षा दिली आहे. आता या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
दरम्यान, जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या 15 पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणाऱ्या घरासाठीही सरकार मदत करेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. तर, शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी सरकारचीच राहील, असेही मुनगुंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्षलवाद फोफावला आहे. आपल्या पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. मात्र, यापूर्वी नक्षलवादी 15 ते 20 च्या गटाने फिरत होते. मात्र, आता हेच नक्षलवादी 100 आणि 200 च्या टप्प्याने या भागात राहतात, फिरतात. यापूर्वी नक्षलवादी मारण्याचा दर 4.48 होता. मात्र, या पाच वर्षात 98 नक्षलवादी मारले असून तो दर साधरणत: 20 वर पोहोचला आहे. गेल्या 39 वर्षात 2018 मध्ये एकही दुर्दैवी घटना पोलीस दलाबाबत घडली नाही. मात्र, यंदा ही दुर्दैवी घटना घडल्याचं दु:ख असल्याचेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे. दरम्यान,गेल्या सरकारनेही नक्षलवाद संपुष्टात येण्यासाठी उत्तम काम केलं आहे. त्यामुळे, आमचं किंवा त्यांचा सरकार हा मुद्दा येत नाही. आमचं सरकारही नक्षलवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही मुनगंटीवर यांनी म्हटले आहे.