लाेकमत न्यूज नेटवर्क
भेंडाळा वार्ता : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत नवेगाव माल येथील आराेग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सध्या एकाच आराेग्य सेविकेवर येथील सेवेचा भार आहे. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून या आराेग्य केंद्राची सेवा अस्थिपंजर झाली आहे.
सन १९९२ पासून नवेगाव माल येथे आराेग्य उपकेंद्र सुरू आहे. उपकेंद्राची इमारत सुसज्ज आहे. काही काळ येथील कारभार सुरळीत सुरू होते. मात्र, सध्या येथील कारभार एकाच आरोग्यसेविकेच्या भरवशावर सुरू असून येथील आरोग्य सेवा सलाईनवर आहे. येथील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नवेगाव माल गावाची लोकसंख्या १ हजार ४५ असून सात सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत आहे. कुटुंब संख्या २४० आहे. गावातील आरोग्याच्या समस्येचा विचार करून आयुष्यमान भारत स्वास्थ वर्धिनी केंद्र म्हणून या ठिकाणी आरोग्य अधिकारी डॉ. बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे येथील पद बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहे. तसेच आरोग्यसेविका देवजवार यांनी राजीनामा दिला व आरोग्य सेवक धारने यांची बदली झाली आहे. त्यामुळे गावाच्या आरोग्यासाठी असलेली तीन पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे सध्या एकाच आरोग्य सेविकेच्या भरवशावर आरोग्य उपकेंद्र सुरू आहे. त्यामुळे गावातील आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. गावातील गरोदर माता, बालके यांची नियमित तपासणी करण्याचा भार एकाच आरोग्य सेविकेवर आल्याने अनेक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्याची गरज आहे.
बाॅक्स......
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
कोरोनामुळे शासन स्तरावर आरोग्य विभागाची रिक्त पदे भरणे बंद होते. शासन स्तरावर पदे भरणे सुरू होतील त्या वेळी येथील रिक्त पदे भरण्याचे जि. प. प्रशासनाकडून सांगितले जात आहे. आराेग्याची समस्याही गंभीर असल्याने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष देऊन नवेगाव माल आराेग्य उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जि. प. सदस्य कविता भगत व पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांनी केली आहे.