व्होटर स्लीपचे वितरण नाही : केंद्र अधिकाऱ्याकडे असलेल्या यादीतील नावे गायबगडचिरोली : तालुक्यातील नवेगाव येथील यादीवरील मतदार क्रमांक व नाव जुळत नसल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त १२ वाजेनंतर तैनात केला. नवेगाव येथे एकूण ५ हजार ६०० मतदार असून एकूण सहा मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. निवडणूक विभागाच्या नियमाप्रमाणे मतदारांना मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व्होटर स्लीप वितरित करणे आवश्यक असतानाही या गावात व्होटर स्लीप वितरित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गावातील मतदार मतदान केंद्राजवळ असलेल्या आपल्या यादीमध्ये आपला नाव व मतदार क्रमांक शोधत होते. त्यानंतर मतदान केंद्रात जाऊन स्वत:चे नाव व मतदार क्रमांक सांगत होते; मात्र नाव व मतदार क्रमांक यांचा ताळमेळ जुळत नव्हता. अनेकांचे बाहेर लावलेल्या यादीत नाव होते. मात्र मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडे असलेल्या यादीत नावच नव्हते. नाव नसल्यामुळे मतदान केंद्र अधिकारी मतदारांना मतदान करू देण्यास नकार देत होते. त्यामुळे जवळपास ३० टक्क्याहून अधिक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. मतदानापासून वंचित राहिल्यामुळे नागरिकांमध्ये निवडणूक विभागाविषयी असंतोष निर्माण झाला होता. मतदारांनी मतदान केंद्राच्या परिसरात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांनी दुपारी १ वाजताच्या सुमारास अतिरिक्त कुमक बोलवून घेतली. सहाही मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला. मतदार यादीतील घोळ होण्यासाठी स्थानिक बीएलओ जबाबदार असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. दुपारच्या सुमारास नवेगावचे तलाठी यांनाही घेराव घातला. (नगर प्रतिनिधी)
नवेगावच्या मतदार यादीत घोळ; अनेक मतदार परत गेले
By admin | Published: February 17, 2017 1:17 AM