गडचिराेली : पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एका इसमाला झाेपेतून उठवून गावातील चाैकात नेऊन सर्वांसमोर धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करणाऱ्या नक्षल आराेपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ३१ मार्च राेजी ही शिक्षा न्या.बी.एम.पाटील यांनी ठोठावली.
चंद्रिका ऊर्फ रंजित जेठुराम राऊत (५०) रा.घाेटसूर ता.एटापल्ली असे शिक्षा झालेल्या नक्षल आराेपीचे नाव आहे. ६ सप्टेंबर २००९ राेजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आराेपी चंद्रिका ऊर्फ रंजित राऊत याने आपल्या इतर नक्षल साथीदारांना घेऊन धानाेरा तालुक्याच्या भीमपूर गावात प्रवेश केला. वासुदेव कारू नराेटे रा.भीमपूर हा इसम आपल्या घरी झाेपला असताना बंदुकधारी नक्षलवाद्यांनी त्याला झाेपेतून उठवून चाैकात नेले. गावातील लाेकांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी धारधार शस्त्राने त्याच्या गळ्यावर वार करून वासुदेव नराेटी याची हत्या केली. यावेळी आराेपी चंद्रिका राऊत याच्यासाेबत नक्षलवादी दिवाकर, इंदिरा आक्का, जगदीश व इतर १०० ते १५० बंदुकधारी नक्षलवादी उपस्थित हाेते. पाेलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी नराेटे यांची हत्या केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण गडचिराेलीच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी साक्षी पुरावे तपासून व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आराेपी चंद्रिका ऊर्फ रंजित राऊत याला जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियाेक्ता एन.एम. भांडेकर व एस.यू. कुंभारे यांनी काम पाहिले.