गडचिरोली : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील तीन गावांत ३१ मे रोजी रात्री तेंदूपानांची जाळपोळ करुन नक्षल्यांनी ठेकेदारों को मार भगाओ... असा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. जाळपोळ केलेल्या ठिकाणी नक्षल्यांचे धमकीचे पत्रक आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात तेंदूपाने गोळा करण्याचा हंगाम सुरु आहे. मजुरीचे दर वाढवून देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर येत असून पोलिसांनी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुुरु केला आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात तेंदू्र हंगाम सुरु होताे. यंदा अवकाळी पावसामुळे १५ दिवस तेंदू्पाने संकलित करण्याचे काम उशिराने सुरु झाले. आदिवासींसाठी हे सुगीचे दिवस असतात. तेंदूपाने गोळा करुन मिळालेल्या मजुरीवरच त्यांचे वर्षभराचे अर्थकारण असते. यंदा तेंदू मजुरीचे दर घटलेले आहेत. काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांमार्फत तेंदूपाने संकलित करण्याचे काम सुरु केले आहे. दरवर्षी नक्षलवादी ठेकेदारांना ब्लॅकमेल करुन खंडणी वसूल करत असतात. मात्र, यंदा ग्रामसभांना कामे दिल्याने नक्षल्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे नक्षल्यांनी छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील मुरुमगाव हद्दीतील रिधवाहीत तीन फळींची जाळपोळ केली.
काय म्हटले आहे पत्रकात ?
जाळपोळ केलेल्या ठिकाणी एक पत्रक आढळून आले. त्यात तेंदूपत्ता रेट बढाने तक झुजारु आंदोलन करो, तेंदूपत्ता रेट नही बढाने से ठेकेदारों को मार भगाओ, तेंदपत्ता रेट नही बढाने सरकार और ठेकेदार की मिलिभगत साजीश है, तेंदूपत्ता रेट ११०० रुपये बढाने तक झुजारु जनआंदोलन करो.. असा इशारा दिला आहे. उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी भाकपा (माओवादी) यांच्या नावाने हे पत्रक आहे.
छत्तीसगड सीमेवर तीन ठिकाणी तेंदूपानांची जाळपोळ केलेली आहे. तेथे धमकीचे पत्रक आढळून आले आहे. यामागे नक्षलवादी किंवा त्यांचे समर्थक असण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करुन योग्य तो तपास केला जाईल. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली