गडचिरोली : माओवाद्यांना शस्त्र तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम करणाऱ्या चैनुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा (४८,रा.टेकामेट्टा जि.नारायणपूर, छत्तीसगड) याच्या अटकेनंतर तिसऱ्या दिवशी त्याचा साथीदार मेस्सो गिल्लू कवडो (५०, रा. रेखाभटाळ ता. एटापल्ली ) यास जारावंडी - दोड्डूर जंगल परिसरात बेड्या ठोकण्यात आल्या. चार दिवसांत दोन जहाल नक्षल्यांना अटक केल्याने शस्त्रपुरवठा करणारी साखळी तोडण्यात यंत्रणेला यश आले आहे.
मेस्सो कवडो हा नक्षलचळवळीत एरिया कमिटी मेंबर या पदावर कार्यरत होता. तो माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत असे .१४ ऑक्टोबरला अटक केलेल्या जहाल माओवादी चैनुराम कोरसा याच्या सोबत काम करत होता. १७ ऑक्टोबरला मेस्सो कवडो हा एटापल्ली तालुक्यातील जारावंडी - दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यावरुन गट्टा पोलिस ठाण्यातील जवान, राज्य राखीच दलाच्या १९१ बटालियनचे जवान यांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर राज्य शासनाने सहा लाखांचे बक्षीस ठेवले होते.
मार्च २०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलिस व माओवादी चकमकीवरुन एटापल्ली ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यास अटक केली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक अनुज तारे , कुमार चिंता , यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेडरीचे उपअधीक्षक बापूराव दडस व राज्य राखीव दलाचे असिंस्टंट कमांडन्ट मोहीत कुमार यांनी कारवाई केली . जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ७२ माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
दोन गाव पाटलांच्या हत्येचा आरोप
मेस्सो कवडो याची नक्षल दलममधील कारकीर्द २०१७ नंतर बहरली. त्यापूर्वी तो माओवाद्यांना जीवनावश्यक सामान आणून देणे, पोलिसांवर निगराणी राखणे अशी कामे करायचा. २०१७ मध्ये तो पुरवठा टीममध्ये सदस्य पदावर भरती झाला व २०२३ पर्यंत कार्यरत होता. या दरम्यान त्यास एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नतीही मिळाली. नोव्हेंबर, डिसेंबर २०१७ मध्ये मुस्फर्शी जंगल परिसरातील चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. २०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरातील चकमकीतही तो सहभागी होता.
२०२१ मध्ये रामनटोला (ता.एटापल्ली) व २०२२ मध्ये दोड्डूर (ता.एटापल्ली) येथे दोन गाव पाटलाच्या खुनात त्याचा सहभाग होता. २०२१ मध्ये छत्तीसगडमधील ताडबैली (जि. कांकेर) येथील मोबाईल टॉवर जाळपोळ प्रकरणातही तो सामील होता.