गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील 'कोलामार्का' वन्यजीव अभयारण्याला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे राज्यातील ५१ वे अभयारण्य ठरले आहे. या ठिकाणी असलेल्या रानम्हशींचे संवर्धन हाेण्यास चालणा मिळणार आहे.
सिरोंचा वनविभाग राज्याच्या नकाशावर वन वैभवात भर टाकणारे म्हणून ओळखले जाते. येथे उच्च प्रतीचे सागवान मिळत असल्यामुळे या वनविभागाचे नावलौकिक झाले आहे. सध्या नामशेष होणाऱ्या रानम्हशी सिरोंचा वनविभागात आहेत. २०११ मध्ये 'नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लॅब' मध्ये कोलामार्का हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार नोव्हेंबर २०१२ मध्ये ५ वर्षांचा नियोजन आराखडा तयार करून ८ जानेवारी २०१३ रोजी कोलामार्का हे राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.
कमलापूर वनपरिक्षेत्रात असलेले कोलामार्का हे महाराष्ट्रातील रानम्हशींसाठी एकमेव राखीव संवर्धन क्षेत्र आहे. एकूण १०८.७२ किमीमध्ये हे विस्तारलेले आहे. २०१३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. ९ वर्षांनंतर याला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. जगातील एकूण चार हजार रानम्हशींपैकी एकट्या भारतात सुमारे तीन हजार पाचशे रानम्हशी आहेत. कोलामार्का येथील रानम्हशी १८६० पासून म्हणजेच सुमारे १६२ वर्षांपूर्वीपासून येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड मिळून २०० रानम्हशी आहेत. त्यापैकी या भागात सुमारे २२ ते २५ रानम्हशींचा कळप आढळतो.
गडचिरोलीतील घनदाट जंगल आणि ऊत्तम वातावरण पुरेसे पाणी आणि खाद्य यामुळे हा अनमोल ठेवा कायम आहे. रानम्हशींचे आयुष्य साधारणत: २५ वर्षांचे असून दीर्घ प्रजनन काळ आहे. साधारणपणे तीन ते चार वर्षांत एका पिलाचा जन्म होतो. कमलापूर येथील हत्ती कॅम्पनंतर दुर्मिळ रानम्हशी हे गडचिरोली जिल्ह्याचे वनवैभव आहे.