गडचिरोली - एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात नक्षलींशी झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली, असा आरोप सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी आहे.या समितीमध्ये मानवाधिकार संदर्भात काम करणाऱ्या विविध संघटनाच्या ४४ सदस्यांचा समावेश होता. त्यांनी दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून या चकमकी संदर्भातील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात कसनासूर जंगलात चकमक घडलीच नाही. तर पोलिसांनी मृतकांना चारही बाजूने घेरून त्यांच्यावर हॅन्ड ग्रेनेड व लॉन्चर फेकले. त्याचबरोबर चारही बाजूने फायरिंग झाली. मृतकांनी मात्र फायरिंग केली नाही. त्यामुळे याला चकमक म्हणणे चुकीचे असून ही एक प्रकारची सामूहिक हत्या आहे, असा आरोप समिती सदस्यांनी केला. जे लोक मारले गेले, त्यामध्ये काही गावक-यांचासुध्दा समावेश आहे. पोलिसांनी सुध्दा त्यांना बेपत्ता दाखविले आहे. २२ एप्रिलच्या चकमकीत नक्षल कमांडर नंदू व त्याच्या इतर सहा साथीदारांना पोलिसांनी जिवंत पकडले व नंदूकडून नक्षलींनी राजाराम जंगलात साठलेला पैसा शोधून काढल्यानंतर त्याच्यावर व इतर साथीदारांवर गोळ्या झाडल्याचे समितीचे सदस्य म्हणाले. ४० मृतदेहांपैकी केवळ दोघांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्याचे डॉक्टरांनी समिती सदस्यांना सांगितल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला आशिष गुप्ता, एन. नारायणराव, व्ही. रघुनाथ, क्रांती चैतन्य, एन. गंगाधर, डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, जि.प. सदस्य अॅड. लालसू नागोटी यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते.या आरोपांसंदर्भात पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता, हे आरोप बिनबुडाचे असून सत्यावर आधारित नसल्याचे ते म्हणाले. मृत नक्षल्यांच्या शरीरात बंदुकीच्या गोळ्या आढळल्या असून तसा शवविच्छेदन अहवालही असल्याचे सांगितले.चौकशीतून सत्य समोर येईल या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते समोर येईलच. त्यानुसार कारवाई केली जाईल. सोबतच एनएचआरसीला रिपोर्ट पाठविल्या जाईल, असे गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
गडचिरोलीतील नक्षल चकमकी बनावट, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:52 AM