लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पाहणाऱ्या एका इसमाला नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. अंताराम पुडो (५८) असे मृत इसमाची नाव असून ते कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील रहिवासी होते. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून त्यांची हत्या झाली आहे.प्राप्त मांहतीनुसार, अंताराम पुडो हे तेंदुपत्ता संकलन केंद्रावर दिवाणजी म्हणून काम पहात होते. रविवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास काही बंदुकधारी नक्षलवाद्यांनी पुडो यांच्या घरी येऊन सोबत चलण्याची फर्मान सोडले. यावेळी त्याच गावातील इतरही दोन इसमांनी नक्षलवाद्यांनी जंगलात नेले. तिथे तिघांचीही विचारपूस केल्यानंतर इतर दोघांना सोडण्यात आले. पण पुडो यांना जबर मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा कापून जिवे मारले व त्यांचा मृतदेह गावाजवळील रस्त्यावर आणून टाकला. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून त्यात पुडो हे पोलीस खबºया असल्याचा संशय व्यक्त केला आहे.खोब्रामेंढा परिसरात टिपगड दलम सक्रिय आहे. परंतू अलिकडे नक्षलवाद्यांची दहशत बरीच कमी झाली आहे. त्यामुळे पुन्हा दहशत प्रस्थापित करण्यासाठी ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिसांनी त्या भागात गस्त वाढविली असून नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
खोब्रामेंढातील तिसरी हत्यानक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांचा अनुभव खोब्रामेंढा या गावाने यापूर्वीही घेतला आहे. याआधी सदर गावातील पंचायत समिती सदस्य आणि सरपंचाची हत्या नक्षल्यांनी केली होती. त्यामुळे या गावात निवडणूक लढण्यासाठी कोणीही नामांकन दाखल करीत नव्हते. काही महिन्यांपूर्वीच छत्तीसगड पोलिसांपुढे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल कमांडर पहाडसिंगकडे या भागाची जबाबदारी होती. मात्र अलिकडे नक्षली दहशत कमी करण्यात पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश आले होते. या गावाच्या परिसरात चकमकीत ८ नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले होते. तेव्हापासून कोणत्याही नक्षली कारवाया या भागात झाल्या नव्हत्या.