लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडवरून छत्तीसगडला जोडणाऱ्या मार्गावरील जुवी नाल्यावर जनसंघर्ष समिती आणि पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने श्रमदानातून उभारलेल्या जुवी नाल्याला ७ डिसेंबरला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पोलीस विभागाकडून आयोजित कार्यक्रमाला गावातील महिला- पुरुषांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली. नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहात त्यांच्या बंदच्या आवाहनाला न जुमानता नागरिकांनी दर्शविलेली ही उपस्थिती ‘आम्हाला तुमचा बंद नको, विकास हवा’ हा संदेश देणारी ठरली आहे. पाच वर्षांपूर्वी, म्हणजे ७ डिसेंबर २०१६ रोजी जुवी नाल्यावर श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. या पुलामुळे गावकऱ्यांना नाला ओलांडून पलीकडच्या गावात जाणे-येणे सोयीचे झाले. त्या पुलाच्या बांधकामाची पंचवर्षेपूर्ती झाल्याचे औचित्य साधून धोडराज पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी एरिया डॉमिनेशन अभियानांतर्गत गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुलाजवळच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकीकडे नक्षल्यांनी २ डिसेंबरपासून नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले असतानादेखील त्याला न जुमानता सदर कार्यक्रमात परिसरातील नागरिक सहभागी झाले.
नक्षलविरोध झुगारून उभारला होता पूल
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरच्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात छत्तीसगड मार्गावर नेलगुंडा, कवंडे ही गावे येतात. अनेक वर्षांपासून जुवी नाल्यावरील पूल बांधकामाला नक्षल्यांचा विरोध होता. मात्र, त्याला न जुमानता ७ डिसेंबर २०१६ धोडराज पोलीस मदत केंद्र आणि जनसंघर्ष समितीच्या पुढाकाराने श्रमदानातून पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याची आठवण म्हणून एसडीपीओ नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली धोडराज मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी राजाभाऊ घाडगे, जनसंघर्ष समितीचे संचालक दत्ता शेरके यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी आम्हाला विकास हवा, गावोगावी रस्ता पाहिजे, अशी मागणी केली.