गडचिरोली : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम हिद्दूर गावात १९ डिसेंबरला मध्यरात्री नक्षल्यांनी रस्त्याच्या बांधकामावरील वाहने पेटवून दिली. घटनास्थळी नक्षल्यांनी एक पत्रक सोडले, त्यात २२ बिहार, झारखंड,उत्तर प्रदेशमधील प्रतिकांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. भामरागडपासून दहा किलोमीटरवर छत्तीसगड सीमेलगत हिद्दूर- दोबूर आणि पुढे कोयरकोटी जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नक्षल्यांनी बांधकामस्थळी असलेल्या वाहनांची जाळपोळ केली. यात एक जेसीबी, टँकरचा समावेश आहे. यावेळी तेथे पत्रक सोडण्यात आले. या पत्रकात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशात प्रतिक्रांतिकारी हल्ले वाढल्याने या विरोधात १६ ते २२ डिसेंबर दरम्यान देशव्यापी प्रचार आंदोलन सुुरु असल्याचा दावा केला आहे. याचाच एक भाग म्हणून २२ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली असून हा बंद यशस्वी करा असे आवाहन केले आहे. मध्यरात्री रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. हा अतिदुर्गम भाग आहे. भामरागड ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास केला जाईल. नक्षलविरोधी अभियान अधिक प्रभावीपणे राबवू.- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक
रस्ता कामाला होता विरोध
दरम्यान, या रस्ता कामाला नक्षल्यांचा सुरुवातीपासूनच विरोध हाेता. हा भाग नक्षलप्रभावित व संवेदनशील आहे. छत्तीसगड सीमेलगतच्या या रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर नागरिकांचे अवागमन वाढेल व गोपनिय हालचालींवर बंधने येतील, यामुळे नक्षल्यांनी वाहने जाळून पोलिसांना आव्हान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.