एटापल्ली / भामरागड (गडचिरोली) : भारतीय कॉम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीने नुकत्याच मृत्यू झालेल्या नक्षली नेता नर्मदा हिच्या स्मृतीप्रित्यर्थ २५ एप्रिलला ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन केले होते. त्याचा परिणाम एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील कामावर दिसून आला. याशिवाय भामरागड तालुक्यात पुलाच्या कामावरील साहित्याची नक्षल्यांनी जाळपाेळ केली.
सुरजागड येथील लोहखाणीतील काम दि. २५ रोजी पूर्णपणे बंद होते. याशिवाय पोलिसांच्या सूचनेवरून ट्रकमधून होणारी लोहदगड वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. लोहखाणीत २४ तास लोहखनिज काढण्याचे आणि वाहतुकीचे काम सुरू असते. परंतु, नक्षल्यांच्या बंदच्या आवाहनामुळे हे काम बंद होते. पण या भागातील बस आणि इतर बहुतांश व्यवहार सुरू होते.
भामरागड तालुक्यात मरकणार भागात पुलाचे बांधकाम सुरू आहे. तसेच लष्कर भागातही पुलाचे बांधकाम सुरू आहे. नक्षल बंदमुळे हे काम बंद असले तरी त्याठिकाणी असलेले मिक्सर मशीन आणि सेंट्रींगच्या साहित्याची नक्षल्यांनी जाळपोळ केली.
पत्रकातून टाकला निर्मलाच्या कामावर प्रकाश
अनेक वर्षे नक्षल चळवळीत राहून या चळवळीला वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निर्मलाक्का उर्फ उप्पगुंटी निर्मला हिने नक्षल चळवळीत केलेल्या कामावर एका पत्रकातून प्रकाश टाकण्यात आला. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याच्या नावे असलेल्या त्या पत्रकात नक्षल चळवळीसाठी ती आदर्श क्रांतिकारी महिला होती, असा उल्लेख केला आहे.