लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी (कांदोळी) मदत केंद्रावर रविवारी (दि.८) रात्री ८ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही त्या दिशेने गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिले; पण त्यानंतर आकाशात ड्रोनसदृश वस्तू फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
आधी पोलीस मदत केंद्रासमोर असलेल्या अब्बनपल्ली आणि येमली मार्गावरून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. पोलीस जवानांनी सावध पवित्रा घेऊन जशास तसे उत्तर देऊन नक्षलींचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यानंतर पोलीस मदत केंद्राच्या परिसरात आकाशात ड्रोनसदृश वस्तू फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यावरही गोळीबार केला; पण अंतर जास्त असल्याने आणि पूर्ण अंधार असल्यामुळे पोलिसांची गोळी त्या वस्तूचा वेध घेऊ शकली नाही. या सर्व प्रकारामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले असून, एटापल्ली तालुक्यात नक्षली अधिक सक्रिय असल्याचे यातून दिसून येत आहे.
एटापल्ली तालुक्यात हालचाली वाढल्या
काही महिन्यांपूर्वी बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलींनी हत्या केली होती. तसेच इरपा नामक व्यक्तीची बाजारात गोळी झाडून हत्या केली होती. गट्टा पोलीस मदत केंद्रावर हँडग्रेनेड फेकून धमाका करण्याचा नक्षलींचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. नुकत्याच झालेल्या नक्षल सप्ताहात बुर्गी येथे नक्षल बॅनरही लावले होते. तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाला आधीपासूनच नक्षलींचा विरोध आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात नक्षलींच्या हालचाली पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.