गडचिरोली : नक्षलवाद्यांनी शासनविरोधी कारवाया करण्यासाठी टीसीओसी (टेक्निकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) मोहिमेंतर्गत सुरक्षा यंत्रणांना मोठे आव्हान दिले होते. घातपात करुन सुरक्षा यंत्रणेला धोका पोहोचविण्यासाठी भामरागड येथे जमिनीत बॉम्ब लावले होते, परंतु पोलिसांनी हा गेमप्लॅन उधळून लावला. दोन बॉम्ब जागेवरच नष्ट केले तर इतर घातक शस्त्र साहित्य जप्त केले आहे.
फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान शासनविरोधी घातपाती कारवायांसाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर होती. २२ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत विशेष अभियान राबविले. नेलगुंडा गावास भेट देऊन जवान बाहेर पडत होते. यावेळी गोंगवाडा रोडवर एक क्लेमोर माईन्स, महाकापाडी रोडवर एक व महाकापाडी पगदंडीवर एक कुकर बॉम्ब मिळून आला. यासोबतच एक बॅटरी, एक क्लेमोरसाठी वापरलेला ३ फुटाचा लोखंडी पाईप व इलेक्ट्रिक वायरचे ७० मीटर लांबीचे तीन बंडल आदी साहित्य हस्तगत करण्यात आले.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अहेरीचे अपर अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी ही कारवाई केली.
दोन बॉम्ब केले जागीच नष्ट
दोन वेगवेगळ्या रस्त्यावर मिळून आलेले २ कुकर बॉम्ब व १ क्लेमोर माईन्स हे बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने सुरक्षितरीत्या नष्ट करण्यात आले. पोलिस ठाण्यात याची नोंद असून नक्षल्यांचा शोध सुरु आहे.