लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांनी २८ जुलै ते ३ सप्टेंबरदरम्यान पुकारलेल्या शहीद सप्ताहादरम्यान भूसुरूंग स्फोटातून घातपात करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला. ही कारवाई गडचिरोली उपविभागांतर्गत मौजा रेगडी ते कोटमी मार्गावर करण्यात आली.पोलिसांच्या गोळीने मारल्या गेलेल्या नक्षलींच्या स्मृतिप्रित्यर्थ नक्षलवाद्यांकडून दरवर्षी २८ जुलै ते ३ सप्टेंबरदरम्यान शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन केले जाते. यादरम्यान सर्व व्यवहार बंद ठेवण्यास सांगितले जाते. अलिकडे नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसला तरी पोलिसांविरूद्ध घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न असतो.
त्याचदृष्टीने हा सप्ताह सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२७) पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान तीव्र करत गस्त वाढविली असताना भूसुरूंग पेरल्याचे उघडकीस आले. रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील रेगडी ते कोटमी मार्गावर सी-६० पथकाचे जवान भूसुरूंग शोधक यंत्राच्या सहाय्याने शोध घेत पुढे जात असताना रस्त्यालगत जमिनीत पेरून ठेवलेला १० किलो वजनाचा भूसुरुंग आढळला. रेगडी मदत केंद्राचे प्रभारी अधिकाऱ्यांनी लगेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यांनी तातडीने बॉम्ब नाशक पथकाला पाठविले. त्या पथकाने सावधानता बाळगत त्या भूसुरूंगाचा स्फोट घडून तो नष्ट करण्यात यश मिळविले.
नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी रेगडी मदत केंद्राच्या चमूला पारितोषिक जाहीर केले. सीआरपीएफ, एसआरपीएफचे अनेक जवान कोरोनाग्रस्त झाले असले तरी पोलिसांचे अभियान सुरूच आहे.