गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (31 जानेवारी) नक्षलवाद्यांनी सहा वाहनांची जाळपोळ केली आहे. वाहनांमध्ये ट्रॅक्टर्सचाही समावेश होता. पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगांव पोलीस चौकीजवळ कोरची तालुक्यात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. जवळपास 12 नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर आणि दोन जेसीबी मशिन्सना आग लावली. कुरखेडा-कोच्चि-चिचगद मार्गावर झाडे तोडून झाडांच्या फांद्या पसवरुन नक्षलवाद्यांनी रस्ता अडवला होता. या घटनेमागे उत्तर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळावर नक्षलवाद्यांशी संबंधित काही बॅनर्स आढळून आले आहेत.
(माओवादी साईबाबाला उपचारासाठी जामीन द्या)
या परिसरात 25 ते 31 जानेवारीदरम्यान शासनाच्या धोरणांविरोधात प्रतिकार ''नक्षल सप्ताह'' पाळण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान नक्षलवाद्यांनी बैठका, सभा आयोजित करण्यासहीत प्रचार आणि प्रसारही केला.