लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली ते भामरागड या मुख्य मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ रात्री मुक्कामी असलेली रस्ता कंत्राटदाराची चार वाहने नक्षलवाद्यांनी मध्यरात्री जाळली. यावेळी २६ एप्रिलला केंद्र सरकारच्या दमन नीतीविरोधात बंद पाळण्याचे आवाहन करत नक्षल्यांची संघटना असलेल्या पीएलजीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बॅनर आणि पत्रकातून करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील गोटलगुडम ते वडलापेठ यादरम्यान रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरू होते. ते काम आटोपून ही वाहने भामरागड मार्गावरील ताडगाव ते मन्नेराजाराम गावादरम्यान केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामावर जात होती. उशीर झाल्याने रात्री १० च्या सुमारास जेवण करण्यासाठी ही वाहने मेडपल्ली येथे थांबली. १० ते ११.३० यादरम्यान स्वयंपाक आणि जेवण करून वाहनावरील चालक त्याच ट्रॅक्टरमध्ये झोपी गेले. दरम्यान, रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास १५ ते २० सशस्त्र नक्षलवाद्यांनी तिथे येऊन ट्रॅक्टरमध्ये झोपलेल्या चालकांना उठवून बाजूला केले आणि चार वाहने पेटवून दिली. त्या वाहनांमध्ये ट्रॅक्टर, पाण्याचा टँकर आदींचा समावेश आहे. ही वाहने छत्तीसगडमधील श्यामल मंडल या कंत्राटदाराची आहेत.