गडचिरोली : जिल्ह्याच्या बऱ्याच भागात पोलिसांच्या नेटवर्कमुळे घातपाती कारवाया करणे शक्य होत नसलेल्या नक्षलींकडून छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात आपले अस्तित्व शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी दुपारी भामरागड तालुक्यातील इरपनार गावाजवळ केलेली रस्त्याच्या कामावरील वाहनांची जाळपाेळ त्याचाच एक भाग आहे. याशिवाय इतरही काही छुपी कारणे असण्याची शक्यता असून, पोलीस त्याबाबतचा तपास करीत आहे.
भामरागडपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी शसस्त्र नक्षलवाद्यांनी येऊन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावरील तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ जेसीबी वाहने जाळली. आपले अस्तित्व दाखविण्यासोबतच नक्षल्यांना हवी असलेली ‘रसद’ मिळाली नसल्याने त्यांनी हे कृत्य घडविल्याचे बोलले जाते. काम लवकर व्हावे म्हणून परिसरातील गावांमधील काही ट्रॅक्टर कंत्राटदाराने भाड्याने घेतले होते. ती वाहनेही नक्षल्यांच्या रोषाला बळी पडली.
कामे करायची तरी कशी?
यापूर्वीही अनेक वेळा दुर्गम भागात रस्ते, पुलाची कामे करताना नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. अलीकडे हा प्रकार थोडा कमी झाला होता. त्यामुळे दुर्गम भागातील विकासात्मक कामेही वाढली होती, पण आता छत्तीसगडमधील नक्षलींच्या बळावर पुन्हा नक्षली कारवाया वाढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने घेतलेली कामे करायची तरी कशी, असा प्रश्न कंत्राटदारांसह सरकारी यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे.