गडचिरोली - नक्षलवाद्यांनी यावर्षी सुरू केलेले हत्यासत्र अजूनही थांबलेले नाही. शनिवारी पुन्हा दोन नागरिकांची हत्या केली. गेल्या २२ जानेवारीपासून सुरू असलेल्या या हत्यासत्रातील बळींची संख्या ७ झाली आहे. पोलीस खबऱ्या किंवा पोलिसांना मदत करत असल्याच्या संशयातून नक्षलवादी निरपराध नागरिकांना जीवानिशी मारत आहेत.धानोरा तालुक्यातील कोसमी येथील समरू कुडयामी आणि मुलुलपेठा येथील निर्मल गोसावी या दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह सकाळी कोसमी-मर्केगाव मार्गावर टाकले. नक्षल्यांनी त्यांना रात्री आपल्यासोबत नेले आणि पहाटे त्यांची हत्या केल्याचे निदर्शनास आले.तत्पूर्वी गेल्या २२ जानेवारीपासून भामरागड तालुक्यात ४ आणि एटापल्ली तालुक्यात १ अशा पाच जणांची हत्या करण्यात आली. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर आणि अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाजवळच्या जंगलात झालेल्या पोलीस नक्षल-चकमकीदरम्यान ४० नक्षलवादी मारल्या गेले होते. त्याचे पडसाद संपूर्ण नक्षल चळवळीवर पडले. त्यानंतर अनेक महिने नक्षलवाद्यांकडूनहिंसक कारवाया बंद होत्या. नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती गावातील लोकच पोलिसांना देत असल्यामुळे नक्षली कारवायांमध्ये यश येत नाही, या भावनेतून नक्षलवाद्यांना निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे सुरू केले आहे. केवळ संशयावरून त्यांना टिपले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ रूजू होऊन ४० वर्षांत ५२० निरपराध गावकºयांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.
नक्षलवाद्यांकडून आणखी दोन आदिवासींची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 7:20 AM