पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागणाऱ्यागडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागण्याकरिता मुलाखत दिलेल्या गडचिरोली येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका नयना अरूण पेंदोरकर यांनी शनिवारी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या निर्णयामुळे शहरातील काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्याला माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नयना पेंदोरकर यांच्यासह काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात गेलेले व आता भाजपमधून पुन्हा राकाँत प्रवेश केलेले निशांत पापडकर, दुर्गा मंगर (वाघरे), सुरेश बारसागडे, साजन कुमरे, रवी निंबोरकर, योगेश मडावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या बैठकीला राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, शहर अध्यक्ष नितीन खोब्रागडे, युवानेते ऋतूराज हलगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषीकांत पापडकर, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पुरणवार आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कटिबध्द राहिला आहे. जेव्हा-जेव्हा पक्षाकडे सत्ता होती, तेव्हा विकास झाला. त्यामुळे मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच संधी द्यावी, असे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. हेमंत अप्पलवार, संचालन रवींद्र वासेकर तर आभार अरूण हरडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
नयना पेंदोरकरांसह सात जणांचा राकाँत प्रवेश
By admin | Published: November 13, 2016 2:06 AM