गडचिराेली : केंद्र सरकारने पेट्राेल, डिझेल तसेच जीवनावश्यक असलेल्या गॅसचे दर प्रचंड वाढविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारी गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात केंद्र सरकारच्या धाेरणांचा निषेध केला. दरम्यान, यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौकात चूल पेटवून भाकरीही थापल्या.
सन २०१४ पासून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने सातत्याने वस्तूंची भाववाढ केली. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पराभवाच्या भीतीने पेट्राेल, डिझेल, गॅस, सिलिंडरच्या किमती स्थिर ठेवल्या. परंतु निवडणूक आटाेपताच पुन्हा दरवाढ करून सामान्य जनतेस लुटण्याचा धंदा सुरू केला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. देशपातळीवरील भाजपचे नेते केवळ पोकळ आश्वासने देतात. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा मुळीच विचार केला जात नाही. केवळ धनाढ्य व उद्योगपतींचे हित जोपासले जाते, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धाेरणांविराेधात जाेरदार नारेबाजी केली. याप्रसंगी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.