गडचिरोली : गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातील ॲंटी इन्कम्बसीचा विचार करून महायुतीत जागा राष्ट्रवादीला सोडवून घ्या, अशी मागणी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.
मी ऑल पार्टी कँडिडेट आहे, अशा शब्दांत त्यांनी स्वपक्षाला सूचक इशारा देतानाच रेल्वे देसाईगंजच्या पुढे येईना, ती आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल, असे म्हणून त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या. शहरातील चंद्रपूर रोडवरील एका लॉन्समध्ये ७ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) निर्धार मेळाव्यात मंत्री आत्राम यांनी ही दर्पोक्ती केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, इतर मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, माजी आमदार हरिराम वरखडे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. सभापती, रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, रिंकू पापडकर आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, या जिल्ह्यात आदिवासी व ओबीसींची संख्या अधिक आहे. भगवान बिरसा मुंडा योजनेतून आदिवासींचा उत्कर्ष केला जात आहे. ओबीसींसाठी २५ हजार घरकुले देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गडचिरोली- चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घ्या, या मतदारसंघात राष्ट्रवादीला पोषक वातावरण असून काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार अशोक नेते यांचे नाव घेता ते म्हणाले, दिल्लीला जातात अन् परत येऊन आराम करतात. रेल्वे देसाईगंजच्या पुढे सरकत नाही. ती आणायची असेल तर मलाच दिल्लीला जावे लागेल. गडचिरोलीतील अहेरी व गोंदियातील आमगाव विधानसभा क्षेत्रावरही त्यांनी दावा सांगितला. हे दोन्ही मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. सामान्यांचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठीच सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
नोंद घेतली, योग्य वेळी पक्षापुढे विषय मांडणार
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या मागणीची नोंद घेतली असल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. धर्मरावबाबा हे विकासप्रिय नेतृत्व असून ते जे ठरवतात ते करून दाखवतात, असे ते म्हणाले. गडचिरोली- चिमूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी योग्यवेळी पक्षापुढे विषय मांडतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शहरात लवकरच कार्यालय बांधणार
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शहरात लवकरच कार्यालय उभारणार असल्याचे सांगितले. रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांना त्यांनी जागा पाहा, असे जाहीर भाषणात सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व रायुकॉं. जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांचा भाषणात आवर्जून उल्लेख केला. मी प्रदेशाध्यक्षपद सोडले अन् सत्ता गेली, आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष झालो व सत्ता आणली. तुम्ही मात्र जिल्हाध्यक्षपदी कायम आहात, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.